अशी का वागतात मुलं ? – श्रुती पानसे
मुलांशी कसं वागायचं ? हा प्रश्न सर्वच पालकांना, अनेक प्रसंगांत – अगदी कोणत्याही वयासाठी पडतो. यातून प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं मार्ग काढत असतो.
आपण काढलेला हा मार्ग प्रत्येकाला त्या त्या वेळी योग्यच वाटत असतो. स्वत:ला आलेले आपल्या पालकांचे अनुभव, आपल्या आसपासची इतर माणसं मुलांशी जसं वागतात, थोडं फार वाचन यातून आपण आपल्याला पडलेले पालकत्वाचे प्रश्न सोडवत असतो; किंवा असंही बऱ्याचदा होतं की, आपण प्रश्न सोडवत वगैरे काहीच नाही. मनात येईल तसं, परिस्थितीला अनुरूप ठरेल असं वागून मोकळे होतो.
असं वागतानाही काही गोष्टींचं किमान भान राखावं. आपलं वय मुलांपेक्षा किती तरी जास्त असतं म्हणून भान राखण्याची जबाबदारी ही आपलीच असते. एवढ्यासाठीच आपल्याला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. मुलांच्या वाढीत आपली नेमकी भूमिका काय आहे, पालक म्हणजे नक्की काय ? मुलांच्या वर्तनाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवणं हे पालकत्व, की मार्गदर्शन करणं हे पालकत्व ? पालकांनी मदतनीस असावं असं म्हणतात, पण ते आपल्याला जमतं का ? जमेल का ?
खलील जिब्रान यांचं म्हणणं असं आहे की, तुमची मुलं तुमची नसतात. जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुलं आणि मुली जन्म घेतात. ते तुमच्यामधून जन्म घेतात, पण तुमच्यासाठी, तुमच्याकडून जन्म घेत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, पण तुमचे विचार देऊ शकत नाही. कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊन जन्माला येत असतो. मला वाटतं, पालकत्वाची ही मेख समजून घेतली पाहिजे. खलील जिब्रान जे म्हणतात ते कदाचित कडू घोटासारखं असेल, पण खरंही आहे.
मुलांशी वागताना म्हणूनच भान राखण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपल्याला मुलांची बाजू माहीत हवी. आपल्या शब्दांचे, आपल्या वागण्याचे पडसाद त्यांच्या मनात कसे पडतात हे बघायला हवं. आपलंच आपण तपासायला हवं. ही तपासणी करण्यासाठीच पुस्तक लिहिण्याचा हा प्रयत्न केलाय.
या पुस्तकाचे, सोयीसाठी काही भाग केले आहेत. मुलं आणि पालक यांच्यामध्ये ज्या गोष्टी घडू शकतात, ज्या गोष्टीनी बिनसू शकतं, त्याप्रमाणे हे भाग केलेले. आहेत. बहुतेकांच्या मनात, एका कोपऱ्यात भीतीची जागा असतेच. परंतु मुलांच्या संदर्भात ‘भीती’चा विचार केला तर त्यांना कसली कसली भीती वाटते, वाटू शकते, भीती वाटण्याचे परिणाम काय होतील – यावर हे प्रकरण आधारलेलं आहे. तसंच हट्टाचं. मुलं हट्टी आहेत, असं एक सर्वसाधारण मत. पण ते नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी हट्ट धरतात, या हट्टीपणाला कारणं काय आहेत, हट्टीपणाला वय असतं का ? हट्टी मुलं मोठी झाल्यावर तशीच हट्टी राहतात का ? अशा प्रश्नांची उत्तरं आपण शोधली, कृतीत आणली, तर हट्टीपणावर काही उपाय करता येतील.
राग ही नकारात्मक पण सार्वत्रिक भावना. रागाचा निचराही व्हायलाच लागतो. रागाचे आविष्कार अनेक ! लटक्या रूसव्यापासून भीषण आक्रस्ताळेपणा-पर्यंत ! या ‘रागा’लाही आपण नीट समजून घ्यायला हवं.
मुलं आणि पालक यांच्यात असलेला संवाद-सुसंवाद-कुसंवाद आणि शेवटी संवादच संपणं या नात्याच्या दृष्टीनं उतरत्या पायऱ्या. कशावर भर द्यायचा ते आपलं आपणच ठरवायचं.
शाळेचा संबंध खरं तर शिक्षणापुरता. पण ही शाळा आणि त्या संदर्भातल्या अनेक समस्या मुलांना (किंवा त्यांच्या पालकांना जास्त) भेडसावायला लागल्या आहेत. या समस्यांच्या खुणा नात्यांवरही अर्थातच * पडू लागल्या आहेत. म्हणून शालेय समस्यांचंही एक प्रकरण यात आहे.
या सगळ्या मांडणीला अर्थातच आधार आहे तो मानसशास्त्रातल्या संशोधनांचा आणि आसपास दिसत असलेल्या जित्याजागत्या उदाहरणाचा. या पुस्तकासाठी वैद्य सौ. मधुरा पाटील यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चांची मोठीच मदत झालेली आहे. तसंच प्रकाशक मेधा राजहंस यांच्याही विशेष आवडीचा – अभ्यासाचा-चिंतनाचा हा विषय आहे. त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमधूनच हा विषय सुचला. विषयाला आकार आला.
या पुस्तकात तान्ह्या मुलांपासून ते शाळकरी मुलांपर्यंतच्या पालकत्वाबद्दलच्या गोष्टी आल्या आहेत. तरीही हे पुस्तक फक्त मुलांच्या पालकांसाठी नाही; तर मुलांच्या आसपास वावरणाऱ्या, मुलांचं मन समजून घेणाऱ्या, समजू शकणाऱ्या प्रत्येकासाठीच आहे !
-श्रुती पानसे
Keywords : Ashi Ka Vagatat Mule ǀ Shruti Panse ǀ Unmesh Prakashan ǀ Marathi Balsahity ǀ Palkansathi Pustake ǀ Marathi Balkanvishyiche Lekhan ǀ Marathi Lekh

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review