प्रा. आप्पासाहेब खोत यांचे गवनेर, महापूर, रानगंगा, कळवंड, माती आणि कागूद, मरणादारी, वापसा असे आतापर्यंत एकूण सात कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रा. आप्पासाहेब खोत हे महाराष्ट्रात कथाकथनकार म्हणून सुपरिचीत आहेत व ‘काळीज विकल्याची गोष्ट’ कथालेखनातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या कथासंग्रहामध्ये एकूण चौदा कथा आहेत . प्रा . आप्पासाहेब खोत यांची कथाकथनाची कथा आणि लेखनाची कथा ही वेगवेगळी आहे . ‘काळीज विकल्याची गोष्ट’ या कथासंग्रहातील कथांतून त्यांनी बदलत्या कृषी जिवनाचे प्रभावी चित्रण केले आहे. मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम, माणसांमाणसांतील कमी होत असलेली माणुसकी, नात्यांतील गुंतागुंत, दुष्काळ, दुष्काळामुळे निर्माण होणारे प्रश्न, दुष्काळावर मात करणारा शेतकरी, ऊस उत्पादकांचे प्रश्न, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकांवर पडणारे रोग, गावांगावांतले राजकारण, भावाभावांतले वैर, मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न आदी विविध विषयांवरच्या भिषण वास्तव मांडणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत .‘काळीज विकल्याची गोष्ट’ या कथेत माणदेशातील दुष्काळाचे वर्णन करण्यात आले आहे. दुष्काळामुळे बैलजोडी दावणीला टाचा घासून मरण्यापेक्षा त्यांना विकलेलं बरं, विकताना पण ती कसाबाला न विकता खात्यापित्या दावणीला गेलेलीच बरं असा विचार करणारे औदुंबर काका, त्यांचा मुलगा नागनाथ, काकांची पत्नी पार्वती व रामलक्ष्मणाची मुकी बैलजोडी यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाचे हृदयद्रावक वर्णन या कथेत करण्यात आले आहे. दुष्काळामुळे दिड लाखाची माणदेशी जातीवंत खिलार बैलांची जोडी अवघ्या लाखात विकल्यावर आपण आपले काळीज विकले अशी जाणीव करून घेऊन रडणारा शेतकरी वाचताना वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही.थोरली लेक कमलचं आकस्मिक निधन झाल्यावर तिचे तीन महिन्याचे बाळ व जावयाचा उघडा पडलेला संसार वाचविण्यासाठी, आपली लग्न ठरलेली दुसरी लेक मंगलचं लग्न जावयाबरोबर लावून देणाऱ्या शामरावच्या कुटुंबाचे परिवर्तनवादी विचार ‘वडाची पारंबी’ या कथेतून मांडले आहेत. ‘दूध आणि फॅट’ या कथेत दूध डेअरीकडून दूध उत्पादकांची केली जाणारी पिळवणूक व फसवणूक याचे ज्वलंत चित्रण करण्यात आले आहे. ‘लोकरी मावा’ या कथेत ऊसावर पडलेल्या लोकरी माव्यामुळे उद्ध्वस्त झालेला कर्जबाजारी शेतकरी, यांचे भिषण वास्तव मांडण्यात आले आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला त्याची पत्नी आत्महत्येपासून रोखते आणि म्हणते, ‘झालं गेलं इसरून जायाचं. एकांदयावर्षी एकांदं पिक वाया गेलं म्हणून जलम वाया जाईत न्हाई. धनी कुणब्यानं मरायचं नसतं आणि रडायचंबी नसतं. लढायचं असतं’. ‘बांधावरचं झाड’ या कथेत जमिनीच्या बांधामुळे भांडण करून सख्खे भाऊ ऐकमेकांचे पक्के वैरी कसे होतात व पिढ्यान पिढ्या वैर कसे जोपासतात. याचे वर्णन करण्यात आले आहे.घराच्या घरपणाला संस्कारांची सावली असली तर ते घर असते . संस्कारांची सावली नसली तर घराला नुसतीच घर – घर असते असे विचार ‘घरपण’ या कथेतून मांडण्यात आले आहेत .‘काळीज विकल्याची गोष्ट’ या कथासंग्रहातील सर्वच कथा कसदार आहेत. प्रा. आप्पासाहेब खोत हे ग्रामीण मातीशी नाळ असणारे कथाकार आहेत. त्यांच्या लेखनात सातत्य आहे. आदरणीय आसाराम लोमटे यांनीही या कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर तसे अधोरेखित केले आहे. ग्रामीण माती, ग्रामीण शेती, ग्रामीण वास्तव परिस्थिती आणि ग्रामीण संस्कृत्ती या सर्वांचा वास्तवपूर्ण अविष्कार प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या कथांतून दिसून येतो. शेती मातीचा हुंदका आणि हुंकार त्यांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतो. या कथांच्या माध्यमातून यंत्रयुगातील बदलत्या खेडयापाडयाचे वास्तव दर्शन घडते. सहा कादंबऱ्यांचे लेखन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र लेखनही खोत सरांनी केले आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमातही समावेश झाला आहे. महाराष्ट्रातले प्रतिष्ठेचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनेक ग्रामीण साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषविली आहेत. ई. टीव्हीवरून प्रसारित झालेल्या त्यांच्या कथाकथनांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले होते. प्रा.आप्पासाहेब खोत यांनी साहित्यातले विविध साहित्यप्रकार दमदारपणे हाताळले असले तरी ग्रामीण जिवनातले तळ कसदारपणे साकारणारी त्यांची कथा दिवसेंदिवस फुलत आहे हे ‘काळीज विकल्याची गोष्ट’ हा कथासंग्रह वाचल्यावर लक्षात येते.
Appasaheb Khot, Lalit Publication, Marathi katha Sangrah, kathakathan, Marathi story Book, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store




















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review