कुठे आहे स्त्री –पुरुष समानता ?
जगभरात सर्व समाजांत आणि संस्कृतींमध्ये स्त्रियांना नाना प्रकारचे उठाव करून स्वत:च्या विकासासाठीच्या विविध संधी मिळवाव्या लागल्या आहेत. स्त्रियांना मानवेतरासारखी वागणूक अनेक पिढ्याच नव्हे, तर, अनेक शतके मिळत राहिली. त्यामानाने आजच्या स्त्रीची परिस्थिती अंशत: बदलत आहे. काही उच्च समाजामध्ये स्रीला जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीने वागवले जाते. पण त्याच प्रमाण अत्यल्प आहे. खेरीज वरवर दिसणाऱ्या वर्तनाच्या पातळीवरील समस्यांबरोबर खोलवर रूजलेल्या व वर्तनाच्या मुळाशी असलेल्या मानसिक समस्यांचा विचार मात्र फारसा होत नाही. मानसिकदृष्ट्या स्त्री स्वयंपूर्ण होईल तरच तिच्या आयुष्यात यथायोग्य फरक पडेल.
स्वत:ला कमी समजून इतरांची सेवा करण्यासाठीच आपला जन्म असल्याची समजूत सामाजिकीकरणातून स्त्रीच्या मनात पक्की रुजवली जाते. त्यामुळे बव्हंशी स्रियांची स्वसंकल्पना व स्व-मूल्यमापन खालच्या-प्रतिचे असते. स्वत:च्या सुप्त गुणांचा, कौशल्यांचा, आवडी-निवडींचा विचार तर दूरच, पण पर्याय उपलब्ध असतानाही निव्वळ घरकामाच्या चौकटीत ती स्वत:ला बांधून ठेवताना आढळते. घराबाहेर नोकरी व कामकाज करणाऱ्या स्रियाही वरवर पाहता अधिक स्वातंत्र्य उपभोगत असल्यासारखे दिसले, तरीही सतत पुरुषांवर अवलंबून असतात. लहान-मोठे निर्णय स्वत: घेत नाहीत. घरी आणि कामाच्या ठिकाणीही संधी, सत्ता व आदर यांपासून त्यांना दूरच ठेवले जाते. त्यांचे हक्क डावलले जातात.
शहरी भागात ग्रामीण भागाच्या मानाने परिस्थिती बरी असावी असे वाटले तरी, शहरी भागात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त घटते आहे. यावरून समाजाची व स्त्रीची स्वत:ची स्वत:कडे बघण्याची दृष्टी खरंच सुधारते आहे का, हे स्पष्ट होते.
मानसिकदृष्ट्या सरी आजही परावलंबी, परधार्जिणी, आवडीने दास्यत्व स्वीकारणारी, पारंपरिक मूल्ये जपणारी, अन्याय निमूटपणे सहन करणारी, समाजाच्या निंदेला अतिशय घाबरणारी, आत्मविश्वासाच्या अभावाने मागे पडणारी अशीच दिसते. आजही आदर्श स्त्री त्याग करणारी, कष्ट करणारी, आज्ञाधारक, नम्र, सेवाभावी असावी अशी अपेक्षा केली जाते. शतकानुशतके अन्याय सहन केल्याने कौटुंबिक हिंसाचारासारख्या, मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या गोष्टीसंबंधी तिची संवेदनशीलता ती हरवून बसली आहे.
स्त्रीत्वाच्या ओझ्याखालून स्त्री कधी मुक्त होणार, माणूस म्हणून स्वत:च्या अस्तित्वाची अनुभूति तिला कधी मिळणार, तिची अस्मिता जागी होण्यासाठी आणखी किती पिढ्यांना वाट पाहावी लागणार हा खरा प्रश्न आहे. स्त्रीची पुरुषाशी तुलना करण्यापेक्षा तिच्या क्षमता, कौशल्ये पुरुषापेक्षा कशा वेगळ्या आहेत हे समाज कधी समजून घेणार आणि स्त्रीला विकासाची संधी कशी प्राप्त होणार, हा विचार अस्वस्थ करणारा आहे. सामाजिक न्याय हरप्रयत्नाने मिळवणारा समाज कौटुंबिक न्यायाकडे मात्र हेतुत दुर्लक्ष करीत आहे. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी स्त्री स्वत:लाच जबाबदार धरते आहे. जणू स्त्री एका सांस्कृतिक पिंजऱ्यात अडकली आहे. मनाने स्वतंत्र, स्वाभिमानी, आत्मविश्वासाने, ठामपणे स्वत:च्या बुद्धिमत्तेचा, क्षमतांचा अभिक्षमतांचा पुरेपूर उपयोग करून पुढे जाणारी स्त्री उद्याच्या जगाला अपेक्षित आहे. न पेक्षा जगातील साधारण अर्धी मानवजात कायम कुचंबत, पात्रतेपेक्षा नेहमी कमी संपादनात धन्यता मानत, समाजमान्यतेच्या एकाच ध्येयापायी स्वत:च्या आशा आकांक्षांचा बळी देत एका भ्रामक जगात अपूर्ण जीवन जगत राहील. हे चित्र असेच राहिले तर, निव्वळ व्यक्तीचे वा कुटुंबाचेच नव्हे, तर, समाजाचे आणि सबंध मानवजातीचेच अतोनात नुकसान होईल.
गेली तीस पस्तीस वर्षे स्वत:च्या व इतर स्त्रियांच्या जीवनाचा, समस्यांचा चिकित्सक दृष्टीने लावलेला अन्वय, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले त्याचे विश्लेषण आणि शास्त्रीय संशोधनातून आत्मसात केलेली समजूत या साऱ्यातून हे लेख लिहिले आहेत. यात कोणाला दोष देण्याचा हेतू नसून आत्मपरीक्षणाने वाचकाने लेखिकेबरोबरच या समस्येचा वेध घ्यावा आणि आपले वर्तन या साऱ्याला कितपत जबाबदार आहे हे समजावून घ्यावे एवढीच अपेक्षा!
Kuthe Aahe Shtree Purush Samanta?, Alka Aafale Vaadkar , Unmesh Prakashan, Marathi lekh Sangrah, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Samajik Marathi Book, Shtri Vishayak Pustak, shtri Purush Samanta Vishayi Book,Marathi Books Online store






Reviews
There are no reviews yet.
Write a customer review