सचिन पाटील सांगली जिल्ह्यातील कर्नाळ या गावचे कथालेखक. सांगावा, अवकाळी विळखा, गावठी गिच्चा (२०२२) ही त्यांची प्रकाशित पुस्तके. पहिल्या पुस्तकाच्या चार तर दुसऱ्या पुस्तकाच्या तीन आवृत्ती आलेल्या आहेत, यावरुन त्यांचे कसदार लेखन लक्षात यावे. इतरासारखे सहज त्यांना लिहिता येत नाही. कारण वीस वर्षापूर्वी अपघातात, चाऱ्यानं भरलेली बैलगाडी अंगावर पडल्याने मज्जारज्जूला जोरदार धक्का बसला. कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यात पायातील ताकद गमवावी लागली.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि साहित्यवाचन-लेखनातून पाच सहा वर्षानंतर ते उभे राहिले; वाॅकर घेऊन थोडेफार चालू लागले, पण पूर्वीच्या पायातील ऊर्जा निसर्गाने हिरावून घेतली. पण त्याबद्दल कधी सचिनने रडगाणे गायले नाही.
सचिन पाटलांना बसून लिहिता नाही येत. एका कुशीवर झोपून ते लेखनकार्य करतात. तेही जास्त वेळ करणं अवघड, परंतु जीवनाविषयीच्या आशावादी दृष्टीकोनामुळे ते सातत्यपूर्ण सकस लेखन करत आहेत. पाय गमावल्यानंतर पाय आणि आपल्या भोवतालाविषयीच्या संवेदनशील आठवांचे ठळक ठसे म्हणजे ‘हर्मिस प्रकाशनाने’ प्रकाशित केलेले “पाय आणि वाटा” हे पुस्तक!
सचिन पाटलांनी हे पुस्तक ‘ज्यांना पाय नाहीत अशा समदुःखी जीवांना’ अर्पण केले आहे. या पुस्तकात पंधरा ललितलेख असून ते वाचताना हुरहुर लावून जातात. चुटपूट लावून जातात. झाड आणि वाट, ती बैलगाडी, राखण, करड्याची भाजी, घोडी, कोरडे डोळे, चिमणीचे पिल्लू, पतंगाचे दिवस, पाठीराखा, पाय आणि वाटा ही त्यातील काही शीर्षके. पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचे आहे.
सर्वच ललितलेखनात शेती-निसर्ग, पूर्वीचा गाव, झाडे, जनावरे, माणसातील स्नेहभाव, माणुसकीचा नातेबंध लेखकाने पकडला आहे. बालमनाच्या कोवळ्या निरागस स्वरानी या वाटा दरवळत आहेत तर , मधेच लेखनाला गमावलेल्या पायाची दुखरी किनारही आहे. सांगली परिसरातील बोलीची नजाकतही पाटलाना सापडली असल्यानं हे लेखन वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. पाय असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक आहे.
-सुरेन्द्र पाटील
Sachin Patil, Harmis Prakashan, Pay aani Vata, Marathi Lalit Sangrah, Marathi Lalitlekh Book, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store












Reviews
There are no reviews yet.
Write a customer review