दि. बा.पाटील यांची या संग्रहातील कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रामीण आणि काही प्रमाणात निमशहरी परिसर हा त्यांच्या कथाचित्रणाचा प्रदेश आहे. ग्रामीण परिसरातील व्यक्तींच्या घुसट कहाण्या सांगण्यात त्यांना विशेष रस आहे. ग्रामीण जीवनातील बदल त्यांनी मूल्यात्मकतेच्या अंगाने न्याहळले आहेत. गावाविषयीचे आंतरिक जखडलेपण आणि रानजित्राबाचा लळा असणार्या माणसांच्या या कथा आहेत. तसेच गाव सोडणाऱ्या पिढीचे चित्रण या कथांत आहे. रानशिवाराची माया आणि व्यावहारिक कारणांमुळे शिवाराविषयी आलेल्या तुटलेपणाच्या वेदनेचे चित्रण त्यांच्या कथांत आहे. त्यामुळे मूल्यभावना आणि व्यवहारिकतेतील ताणतणावांनी ही कथा आकाराला आली आहे. काळ्या आईचा बाजार न पाहवणाऱ्या शेतकऱ्याच्या शोकान्तविसाव्याची ही कथा आहे.
गावठाणातील मोकळिकता आणि शहरातील सोन्याचा पिंजऱ्यातील द्वंदानुभावाची चित्रे या कथेत गडदपणे आविष्कृत झाली आहेत. त्याचबरोबर या वृद्धांच्या संसाराच्या चिंताकथा आहेत. ग्रामसंस्कृतीतील श्रद्धाशील मनाच्या या कथा आहेत. या कथेतील दारिद्र्य, भुकेच्या चित्रणांनी व अपराधभाव आणि नैतिकतेच्या ताणांनी या कथेस वेगळी परिमाणे मिळवून दिली आहेत. त्याचबरोबर ग्रामसभा व तंटामुक्तीच्या गाव पातळीवरील राजकारणचित्रे त्यांच्या कथेत आहेत. दि. बा. पाटील यांची कथा व्यक्तिप्रधान कथा आहे. व्यक्तिचित्रणातून गावसमाज न्याहळण्याची त्यांची लेखनरीत आहे. त्यांची कथाभाषा ओघवती व प्रवाही कथनाची आहे. ग्राम संस्कृतीतील नवे बदल, मूल्यांतरणे आणि व्यक्तींच्या दुःखकथा जाणून घेण्यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरतात.
-प्रा. डॉ. रणधीर शिंदे
Di Ba Patil, Walya, Lalit Publication, Marathi katha Sangrah, Marathi story Book, Gramin Katha Sangrah, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review