२० वे शतक गाजविणारी व्यक्तिमत्त्वे
एकविसाव्या शतकात पदार्पण केल्यानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो, मागील शतकाचा आढावा घेतो, तेव्हा आपल्याला आढळते की, हे शतक गाजविणारी अनेक भारतीय व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. वाड्मय, कला, विज्ञान, क्रीडा अशा भिन्न क्षेत्रांमध्ये त्यांनी दैदीप्यमान कामगिरी केली आहे; आजही करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात, काळाच्या भूमीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा अत्यंत प्रभावी आणि चिरकालीन टिकणारा, असा ठेवला आहे. त्यांच्या कार्यापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आणि आचरणात आणता येण्यासारखे आहे.
मानवी जीवन नश्वर आहे. आज जन्मलेली व्यक्ती उद्या कालवश होते. तिचे प्रियजन काही काळ तिची आठवण काढतात आणि कालांतराने त्यांच्या मनातील आठवणीही धूसर होत जातात. त्यांच्या दु:खाची बोच कमी होत जाते. परंतु वेगळ्या अर्थाने ‘शतकवीर’ मानता येतील, असे काही स्त्री-पुरुष आहेत. त्यांचे कार्य, त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना अमर करून गेले आहे. अशा व्यक्ती, असे महामानव केवळ भारतातच नव्हे; तर साऱ्या जगात होऊन गेले. त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास, तो खूप काही शिकविणारा असतो.
`यात जी व्यक्तिमत्त्वे समाविष्ट केली आहेत, त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चरित्राचा धावता परामर्श घेतला आहे; मात्र त्यांची कामगिरी, त्यांचे कार्य यावर अधिक भर दिला आहे. म्हणूनच, त्यांच्या कार्यामुळे विसाव्या शतकात ते अजरामर ठरले आहेत. एकविसाव्या शतकातील बालक व युवा पिढीस यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपली ध्येये, आपले जीवन, ते यातील एखाद्या मुशीत घालून त्याचा आकार बदलू शकतात – मग ते क्षेत्र कोणतेही असू शकेल. संगीत, कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा—- या प्रत्येक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या व्यक्तींचे कार्य अवर्णनीय आहे.
या पुस्तकात जी व्यक्तिमत्त्वे समाविष्ट केलेली आहेत, ती आमच्या आवडी निवडीची आहेत. याखेरीजही विसावे शतक गाजविणाऱ्या अजून बऱ्याच व्यक्ती आहेत. लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, आशा भोसले, टाटा, गोदरेज, फिरोदिया, रविशंकर, गुरुदत्त, पं. अल्लार खाँ, डॉ. जयंत नारळीकर, भाभा, विक्रम साराभाई, रविवर्मा, सुनील गावसकर, राज कपूर, मदर टेरेसा, बाबा आमटे, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मागांधी, कपिल देव, मेधा पाटकर, कुसुमाग्रज, पं. नेहरू, इंदिरा गांधी, सावरकर, डॉ. आंबेडकर, विवेकानंद, बालकवी, रा.ग. गडकरी, सर्वपल्ली राधाकृष्णन्, प्रेमचंद, कारंथ, प्र.के.अत्रे ही नावे पटकन आठवतात. याखेरीज, अनेक उतुंग व्यक्तिमत्त्वे आहेत. या सर्वांना या पुस्तकात समाविष्ट करणे अशक्यच होते; परंतु त्यामुळे त्यांचे कार्य निकृष्ट अथवा कमी दर्जाचे आहे, असे मात्र नाही. प्रत्येक क्षेत्रात अढळपदावर असणाऱ्या आणि ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या या व्यक्ती सर्वश्रुत आहेत, लोकप्रियही आहेत आणि त्या त्यांच्या-त्यांच्या परीने बेजोड व अजोड आहेत.
प्रत्येक वाचकास हे पुस्तक केवळ रंजक नव्हे; तर उद्बोधक, निदान विचार करायला लावणारे ठरेल, अशी आशा आहे. विसावे शतक गाजविणाऱ्या महामानवांना अर्पण केलेली ही एक आदरांजली आहे, असेच म्हणावे लागेल.
अंतर्गत : अटल बिहारी वाजपेयी, सत्यजित रे, अभिताभ बच्चन, रवींद्रनाथ टागोर, राजीव गांधी, पु. ल. देशपांडे, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. किरण बेदी, स्मिता पाटील, शंतनुराव किर्लोस्कर, पी.टी.उषा , राहुल बजाज, सचिन तेंडुलकर, एम.एफ. हुसेन
Keywords : 20 ve Shatak Gajvinari Vyaktimatve ǀ Asha Parulekar | Unmesh Prakashan ǀ Vyaktichitran ǀ Atal Bihari Vajpayeeǀ Satyajit Ray ǀ Abhithab Bachchan ǀ Rabindranath Tagore ǀ Rajiv Gandhi ǀ P. L. Deshpande ǀ Dr. Amartya Sen ǀ Dr. Kiran Bedi ǀ Smita Patil ǀ Shantanurao Kirloskar ǀ P.T.Usha ǀ Rahul Bajaj ǀ Sachin Tendulkar ǀ M.F. Hussain

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review