‘डोहाळ जेवण’ ही भारतीय संस्कृतीची उत्तम निशाणी आहे. त्यातल्या महाराष्ट्रीय ग्रामीण भागातील संस्कृतीची ती एक अमूल्य देणगी, नव्यानं जन्माला येणाऱ्या नवागताच्या मातेला लागणाऱ्या डोहाळ्यांचा तो अपूर्व असा संस्कृतीने जपलेला ठेवा आहे. प्रा. दिलीपकुमार मोहिते यांच्या ‘डोहाळ जेवण’ या ग्रामीण कथासंग्रहात रखमा, ताम्याची भीष्मप्रतिज्ञा, सैपाक, बंडखोर बंड्या, डोहाळ जेवण आणि कुंदा अशा सहा कथांचा समावेश आहे. या सहाही कथा अस्सल ग्रामीण भाषेत त्या त्या परिसराच्या लोकश्रध्दातून आणि वृत्ती प्रवृत्तींच्या विकार विकल्पांच्या सहज प्रकटणाऱ्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून वाचकाच्या समोर स्थलकालासह आणि प्रसंगांच्या बारकाव्यासह मूर्तिमंत साकारतात.
ग्रामीण जीवनातील छळाच्या, घमेंडीच्या, आरेरावीच्या, कोत्या मनोवृत्तीच्या व्यसनाधीनतेच्या, त्यातल्या धीटाईच्या, सासू-सुनांच्या संबंधांच्या, सैपाकासाठी लागणाऱ्या चिमणीतल्या रॉकेलच्या महागाईच्या आणि पोटाचा खळगा भरण्यासाठी नवरा बायकोच्या होणाऱ्या कुतरओढीचे प्रसंग अतिशय बारकाईने व त्यावर मात करणाऱ्या ग्रामीण जनतेच्या धिटाईचे प्रसंग अस्सल ग्रामीण भाषेत, परिसरातील भाषेच्या डौलात प्रा. मोहिते यांनी मूर्तिमंत टिपले आहेत. ग्रामीण म्हणजे ग्राम्य नव्हे. या ग्रामसंस्कृतीतील मानवतेचा ओलावा त्यांच्या लेखनातून मधासारखा झिरपला आहे. या कथाचे वैशिष्ट्य असे जाणवते की बहुतेक कथा या व्यक्तिप्रधान वाटतात. व्यक्तीच्या क्रिया प्रतिक्रियातून प्रसंग अवतरले आहेत. टकळीतून सूत निघावे तसे या ग्रामकथा सहजगत्या अवतीर्ण झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण बोली, त्यातील ग्रामीण जीवन, तेथील समस्या, वातावरण, जगण्याचा संघर्ष, सत्या असत्याचा झगडा त्यातून उसळलेला ग्रामीण संदर्भ हा मूळत: लेखकाच्या ग्रामीण जीवनाशी असलेल्या नात्यांचा जिव्हाळ्यांचा पालव आहे.
ग्रामीण जीवनाच्या संघर्षातून शिक्षणाचा ध्यास असणारी कुंदा आणि तिची झालेली फसगतही डोळ्यांच्या कडा ओलावणारी कलात्मकता. ही लेखकाची लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखनगर्भ आत्मनिष्ठा वाङ्मयीन महानतेकडे वाटचाल करते. लेखकाचे ग्रामीण जीवनातील अनुभव असे सहजपणे लेखनातून उमलले आहेत. त्यामुळे हुबेहूबपणे व्यक्ती आणि प्रसंग आपल्यापुढे साक्षात प्रगट होतात. शब्द जणू लेखकाच्या प्रतिभेपुढे हात जोडून उभे राहून मला तुमच्या कथेत येऊ द्यात अशी विनवणी करताना जाणवतात. ही लेखकाची खरी उंची आहे.
Keywords : Dilipkumar Mohite ǀ Marathi Katha ǀ Marathi Katha Sangrah ǀ Marathi Story Book ǀ best marathi katha ǀ vinodi marathi katha ǀ Marathi Gramin Katha



















1 review for डोहाळ जेवण । Dohal Jevan
There are no reviews yet.
Write a customer review