गारांचा पाऊस
उन्हाळ्यानं आपण अगदी हैराण झालेले असतो. बाहेर बघावं, तर दिपवणारं ऊन, घरात उकाडा. वैशाख अगदी मातून गेलेला. अशा वेळी वारं सुटतं. वामन-पावलासारखा एक ढग पाहता-पाहता दाटून येतो. लांबून मातीचा वास येतो आणि ‘आऽहा’ म्हणेपर्यंत छपरावर तडतड वाजायला लागतं. लगबगीनं बघावं, तर रस्त्यावर, फरशीवर बत्ताशाएवढे थेंब दिसतात… ‘मस्त झालं ! गारांचा पाऊस येणार ?’ आणि येतोच तो.
काहीतरी केलं पाहिजे, कुणीतरी केलं पाहिजे, असं कुठवर चालायचं? वगैरे विचार बच्चेलोकांची दैनंदिन वेळापत्रकं बघताना सतत येतात. लहान मुलांच्या झोपा ओरबाडून शाळांच्या वेळा, दप्तरांची ओझी, धाक-दपटशा, टप्पू; तरी ती आपली उनाडून घ्यायच्या क्लृप्त्या शोधून हसणं टिकवत असतात ! पण ती जेवढी धडपडतील, तेवढा हसणं थांबवण्याचा वरवंटा आणखी जड होतो आणि खरोखरीच त्यांचं हसणं मावळतं. हसणं मावळण्याचं वय गेल्या काही वर्षांत खूपच लहान होत गेलंय्. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या बिल्डिगमधला एक तीन वर्षं वयाच्या उंबरठ्यावरचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शिकवणीला जाताना मी बघायची आणि घाम पुसायची. अशा एकेका मुलाच्या आईशी बोलता येईल ? कठीण आहे, कारण त्यांच्याशी बोलण्यासाठी कितीतरी दरवाजे उघडावे लागतील, ‘मला माझ्या मुलाला पुढे आणायचंय ! अहो, आत्ता त्याला काय कळतंय ? उद्या तोच मला म्हणल, की तू का नाही मला सांगितलंस म्हणून ! आणि आजकाल सगळी मुलं सर्रास जाताना बघते मी. माझाच मुलगा अगदी हे करू शकत नाही असा लेचापेचा आहे की काय ? करतोय आता जरा खळखळ, पण येईल वळणावर.” अशा काहीशा भूमिकेतून बच्येलोकांची दैनंदिनी मोठीच माणसं गिचमिडून ठेवतात. त्यांच्याशी बोलता बोलता शेवटी जर विचारलं, “तुम्ही हे काही केलं नव्हतंत, तुमचं अडलं का ?” तर त्यांची कल्पना असतेच, आपण खरं म्हणजे कुठल्याकुठे गेलो असतो ! पण तोंडावर बोलत मात्र नाहीत. या कानानं ऐकतात आणि त्या कानान॑ सोडून देतात. एकदा तर एकोनं दुसरीला विचारलं, ”या बाईंना मुलं नाहीत की काय ?” मी पुन्हा एकदा घाम पुसला.
६ ते ९ या वयोगटात खेळणारा एक अफलातून बटू त्याच्या इंग्रजी शाळेचं दप्तर घेऊन परस्पर खेळण्यासाठी दाखल व्हायचा. एक दिवस त्याला न्यायला येणारं माणूस आलं नाही. “ए टीचर, मी एक गेम शिकवतो तुला.” “चल” मी म्हणाले. त्याची बोटं झपाट्यानं काम करू लागली. एका वहीचा कागद टरकावलान् त्याला पटपट घड्या घालून त्यानं पुन्हा तो उलगडला. मागचं टोक चावलेली एक अर्धी पेन्सिल हातात धरून त्यानं मला विचारलं, “टीचर, तुला इंग्रजी येतं ?” “हो, येतं.” मग त्याच्या चेहऱ्यावरची चिंता मावळली. भराभर त्यानं घड्यांवर काहीतरी लिहिलं, कागदाचा चौफुला केला आणि मला एक कोपरा धरायला सांगितला. मग तो चौफुला धरून त्यान’ टिकटॉक टिकटॉक’ करून हलवला. पुन्हा घड्या उलगडल्या आणि म्हणाला, “हे बघ, तू काय निघालीस ते !’’ मी मनात धरलेल्या कोपऱ्यावर Moorkh असं लिहिलेलं होतं. तो म्हणाला, “आलं का वाचता ? ते ना, मी ‘मूर्ख’ असं लिहिलंय् !” मी बाकी कोपरे पाहिले. त्यावर ,Acharat, Bavlat, Makad (आचरट, बावळट, माकड) असं लिहिलेलं होतं. हसून-हसून मला घाम फुटला ,
कुठलीशी एक बालकल्याणविषयक परिषद, वातानुकूलित हॉलमध्ये जेन्युइन इम्पोटेंड विचारांची भेंडोळी भारतीय माणसे फेकताहेत. लॉटरीच्या बक्षिसांच्या आकड्यासारखे बालकल्याण उपक्रमांवर झालेल्या खर्चाचे आकडे स्लाइडवर दाखवून विवेचन चालू आहे. आदिवासी बालवाड्यांशी संबंधित एक बाई माझ्या कानात कुजबुजतात, ‘यातलं साक्षात मुलांपर्यंत पोहोचणारं रुपयात नया पैसा तरी असतं का ? या परिषदेला केलाय त्याच्या चतुर्थांश रकमेचा आमचा प्रकल्प अजून मंजूर झाला नाही – बजेट वर्ष संपत आलं तरी !” त्या थंडगार खोलीतही घाम फुटतो. पुढच्या परिषदेचा निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला असतो.
असं फार उकडायला लागलं, की ‘गारांचा पाऊस’ हवासा वाटू लागतो. दारं ठोठावणारा, छप्पर दणाणून सोडणारा, फटीफटीतून घुसणाऱ्या वाऱ्याचा साथी. शोभाचं पुस्तक एवढंच करून थांबत नाही. मोठ्यांना स्वतःच्या वागण्यातल्या जुलूमाची जण तर ते करून देतंच; पण “खरं सांगा, करता की नाही तुम्ही असं ?” विचारतं आणि, “ ‘हो’ म्हणून खाली मान नको काही घालायला”’, असंही सांगतं. गारांचा पाऊस पडून गेल्यावर कसं स्वच्छ वाटतं, तसेच आपल्या मनातले स्वच्छ अनुभवही जागे होतात. मूलपणाचे कितीतरी अनपढ नमुने डोक्यात गोळा होऊ लागतात.
विचार रुजवणारा मोसमी पाऊस आणि वातावरण पालटवणारा हा गारांचा पाऊस, यांना आपापलं काम आहे. बालकांच्या विकासाचा अभ्यास, संशोधन, पालकांचे उद्बोधन, शिक्षकांसाठी प्रेरणा-प्रबोधन, असा मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या दुष्काळी स्थितीच्या बरोबरीनंच चालू आहे. पण आहे, या बाबतीत आशेला खूपच जागा आहे. त्या कामासाठी अनुकूल वातावरण आणणारा हा गारांचा पाऊस सर्वांना विचार करायला मोकळं करील याची मला खात्री वाटते, यात सर्वांनी मनमुराद भिजावं, एकेक गार वितळेपर्यंत धरावी, मग एखादं आचमन करावं किंवा एखादी गार थेट तोंडात टाकावी. दातात कळ आली तर गिळून टाकावी ! खेळायला अंगण मोकळंच आहे.
श्यामला वनारसे
Garancha Pavus , Garancha Paoos , Garancha Paus , Shobha Bhagvat , Unmesh Prakashan , marathi katha , marathi story book , Marathi Katha Sangrah , Marathi Katha Pustak, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store



















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review