रियल लाईफ डॉन विरप्पन एक रक्तरंजित थरारक जीवन प्रवास (चरित्र )
कोणताही माणूस हा मुळातच वाईट असत नाही. त्याच्या घरातील आणि आजूबाजूचे वातावरण त्याला घडवत असते. जशी माणसाला संगत लाभते, तशी त्याची घडण होते. सुरुवातीला वाल्या कोळी हा एक मोठा दरोडेखोर होता. पण, त्याची श्री नारदमुनी यांच्याशी भेट झाली आणि तो बदलला. तो एक श्रेष्ठ ऋषि बनला. हा संगतीचा आणि वातावरणाचा परिणाम आहे. वीरप्पन याच्या घरातील आणि आजूबाजूचे वातावरणही त्याच्या गुन्हेगारी क्षेत्राला पोषक ठरले. तो लहानपणीच एक निष्णात नेमबाज होता. सर्वजण त्याचे कौतुक करायचे. त्याने आपल्या नेमबाजीचा उपयोग गैरमार्ग व गुन्हेगारीसाठी केला. तो एक उत्तम नकलाकार आणि अभिनेता होता. पण त्याच्या विकासाला पोषक वातावरण मिळाले नाही. त्याच्या सुप्तगुणांचा विकास झाला नाही. तो बंदूक, शिकार या वातावरणात वावरला आणि अडकला. पुढे चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या टोळीत सामील झाला. तोही तस्कर बनला. त्याने अनेक हत्तींचे बळी घेतले. हत्ती मारणे हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ बनला. तस्करीमध्ये त्याला भरपूर पैसा मिळत गेला. इथपर्यंत ठीक होते. अजूनही तो गुन्हेगारीच्या मार्गावर फार लांब गेला नव्हता. पण त्याला योग्य वेळी योग्य गुरू भेटला नाही. पुढे तो दावण तुटलेल्या जनावरासारखा भरकटत गेला. दिशाहीन बनला. त्याच्याकडून एका वनाधिकाऱ्याची हत्या झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. पण त्यातून पैसे देऊन तो पळून गेला आणि हळूहळू तो गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत गेला. चंदन आणि हस्तिदंताची तस्करी बाजूलाच राहिली.
पोलीस आणि वनाधिकारी यांच्याबरोबर त्याचे वैर सुरू झाले. त्यातून ‘खून का बदला खून’ हे रक्तरंजित सूडनाट्य सुरू झाले. दोन्ही बाजूंना जणू मानवी रक्ताची चटक लागली. हे सूडनाट्य ३५ ते ४० वर्षे एखाद्या महायज्ञाप्रमाणे चालू राहिले. त्यामध्ये अनेक व्यक्तींच्या खूनांची आहुती दिली गेली. या सूडनाट्यात सामान्य जनतेचे खूप हाल झाले. खून, बलात्कार, जाळपोळ या गोष्टींनी समाजातील शांतता भंग पावली. लोक भीतीच्या छायेखाली वावरू लागले. सामाजिक स्वास्थ्य नाहीसे झाले. सरकारही यामध्ये काही करू शकले नाही. विररप्पनने पोलिसांना सळो की पळो करून सोडले. त्याच्या वैयक्तिक खूनांचा आकडा शंभरी पार करून गेला. शेवटचा आकडा होता १८४. हा आकडा अधिकृत आहे. प्रत्यक्षात एकूण किती खून केले हे कुणालाच ठाऊक नाही… पोलिसांना सुद्धा. त्यामुळे त्याचे माघारी फिरण्याचे म्हणजे शरणागती पत्करण्याचे सर्व दोर कापले गेले. जोवर अंगात ताकद होती, तोपर्यंत वीरप्पन पोलिसांशी लढत राहिला. पण पुढे त्याच्या टोळीतील सदस्य संख्या अगदी क्षुटुक म्हणजे चारजण इतकी कमी झाली. पुन्हा वीरप्पन टोळीतील सदस्य संख्या भरून काढू शकला नाही. तसेच, त्याची तब्बेतही पहिल्याप्रमाणे साथ देत नव्हती. त्याचा मेंदू म्हणावा तसा काम करत नव्हता. त्यामुळे त्याने शेवटी STF बरोबर बचावात्मक पवित्रा अवलंबला. शेवटी त्याच्याच मर्जीतील एका राजकीय व्यक्तीने विश्वासघात करून त्याला STF च्या हाती सापडण्यास मदत केली. STF ने त्याला जाग्यावरच गोळ्या घातल्या… की त्याला जीवंत पकडून हाल हाल करून मारले? हे एक रहस्यच राहिले. मात्र गरिबांचा हिरो म्हणून तो लक्षात राहिला आणि पुढेही राहील. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने कधीही दारू पिली नाही. तो पूर्णपणे निर्व्यसनी होता. त्याने परस्त्रीकडे कधीही वाकड्या नजरेने पाहिले नाही. कोणत्याही परस्त्रीची छेड काढली नाही. गरीब आणि गरजू लोकांना त्याने सढळ हाताने आर्थिक मदत केली, कुणाच्या लग्नासाठी, आजारपणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी त्याने मदत केली. निरपराध, गरीब लोकांना अजिबात त्रास दिला नाही. तो धार्मिक होता. तो नियमित महाभारत वाचायचा. युधिष्ठिर हा त्याचा आदर्श होता. तो नियमितपणे देवाची पूजा करायचा, त्याशिवाय जेवत नसे. तो म्हणायचा की, “तुम्ही मला मदत केली नाही तरी चालते, पण माझ्या विरोधात जाऊ नका. पोलिसांना माझ्याविषयी माहिती देऊ नका.” एवढे स्पष्टपणे सांगूनही, काही अतिशहाणे लोक त्याच्या विरोधात जाऊन पोलिसांना माहिती देऊ लागले. अशांना मात्र त्याने कुत्र्याप्रमाणे हाल हाल करून मारले. यात त्याचे काय चुकले? पोलिसांनाही त्याने अगदी हाल हाल करून मारले. तो जितका निर्दयी होता, तितकाच दयाळू होता. कुणालाही त्याने हौस म्हणून गोळ्या घातल्या नाहीत. दादागिरी केली नाही. मात्र जो त्याच्या मार्गात आडवा आला, त्याला त्याने सरळ वरचा रस्ता दाखविला. बिनातिकिट प्रवासाचा. टाळी एका हाताने वाजत नसते म्हणून केवळ वीरप्पनला दोष न देता, पोलीस आणि वनाधिकारी यांचे दोषही पाहिले पाहिजेत. असा हा वीरप्पनचा जीवनप्रवास आपण समजून घेतला पाहिजे. त्याचा दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. काय योग्य, काय अयोग्य हे तटस्थपणे ठरविले पाहिजे. तरच, वीरप्पन मधला खरा वीरप्पन आपल्याला दिसेल. एखाद्या व्यक्तीचे दुरूनच पाहन आपण योग्य मूल्यमापन करू शकत नाहीत. कितीही झाले तरी पोलीस हे आपली बाजू दोषरहित असल्याचेच सांगणार. ते आपल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणारच. वीरप्पनला दोष देणारच. म्हणून आपण ते न पाहाता दोन्ही बाजू पाहूनच दोषी कोण हे ठरवले पाहिजे.













Reviews
There are no reviews yet.
Write a customer review