यशाची गुरूकिल्ली
जीवनात यशस्वी होणे म्हणजे आकाशातील चंद्राची अपेक्षा धरणे नव्हे. यश हे अप्राप्य नसते. अनेक व्यक्तित्वगुणांचे पैलू त्याला चिकटलेले असतात. यश हे माणसाचे भाग्य, त्याचे सुख-समाधान ठरविण्यास मदत करणारे असते. आपण भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासाची पाने उलटून बघितली, तर याची आपल्याला प्रचीती येईल. हेलन केलरने आपल्या अंधपणावर अपार प्रयत्न व कष्ट करून मात मिळविली, डेमोस्थेनिस हा तोतरा होता, पण महत् प्रयत्न करून त्याने आपल्या व्यंगावर केवळ मातच मिळविली, असे नाही, तर तो उत्तम वक्ता बनला. शिवाजी महाराजांनी अपार पराक्रम, धैर्य, चिकाटी, निष्ठा या माध्यमांतून हिंदवी स्वराज्य प्राप्त केले. झाशीच्या राणीनेही आपले ‘सबलापण’ सिद्ध करण्यासाठी अपार देशप्रेम, निष्ठा दाखविली होती. .
या सर्व चर्चेवरून व उदाहरणांवरून लक्षात येते, की यशोमाला आपल्या गळ्यात पडावी, यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यश हे ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’, या धोरणामुळे प्राप्त होत नसते. उलटपक्षी, ‘प्रयत्नांती परमेश्वर’, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ या उक्तींना जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. कारण प्रयत्न, चिकाटी, मेहनत यांच्यामुळेच आपल्याला यश मिळत जाते.
यश हे अनादी कालापासून मानवी जीवनाच्या अनेक उच्च ध्येयांपैकी एक ध्येय आहे आणि त्याच्या अस्तित्वास एक त्रिकालाबाधित सत्य आहे, असे आपण म्हणू शकतो. कारण मानवाला जय, सुख, किर्ती यांची प्राप्ती यामुळेच होत असते. आधुनिक काळातही, प्रत्येकास यश मिळविणे आणि मिळणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बालवर्गात प्रवेश मिळविणे, ते थेट देशाचा पंतप्रधान होणे, यासाठी प्रत्येकास यश मिळण्यालाच महत्त्व असते; परंतु स्पर्धेस जेवढे महत्त्व वाढत गेले आहे, तेवढे यश प्राप्त करणे हे एक अप्राप्य ध्येय बनले आहे.
परंतु यश हे फारच वेचक असते. ज्याच्या-त्याच्यावर ते आपला वरदहस्त ठेवत नसते. तर चिकाटी, गुणी, आक्रमक अशांच्या गळ्यात ही यशोमाला पडू शकते.
ज्या व्यक्तीस आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, तिने याबाबत केवळ इच्छा बाळगून चालत नसते, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, अपार आशावाद बाळगावा लागतो. उद्योगधंदा, नोकरी, संसार, छंद यांसारख्या प्रत्येक ठिकाणी यशप्राप्तीसाठी महद् प्रयत्न व्हावे लागतात. यशाला मर्यादा नसावी, त्याला क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची शक्ती असावी. वय, व्यवसाय, लिंग यांचे बंधन त्यास नसावे.
तसेच, आपल्या इतिहासातूनच नव्हे, तर आपल्याभोवती नजर टाकल्यास, खारीच्या चिकाटीने यशाचे कण जमवून, त्यांचा पूल बांधणारे अनेक महाभाग आढळतील. त्यांच्या उदाहरणांपासूनही आपण शिकण्याचे, ज्ञान प्राप्त करण्याचे प्रयत्न करावेत.
दयाळू, नि:स्वार्थी, चारित्र्यवान अशी व्यक्ती जीवनात यशस्वी होते. आपल्या दु:खास न गोंजारता, त्याच्याच पायावर आपण आपल्या यशाची इमारत उभारू शकतो आणि साऱ्या भाग्याच्या रेषाच नव्याने आखू शकतो. हे सर्व कसे साध्य करावे व होईल, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. वाचकांनी हे वाचून, अंतर्मुख होऊन, याबाबत जरूर प्रयत्न करावेत व यश मिळवावे.
Keywords : Yashachi Gurukilli ǀ Yashachi Gurukillee ǀ Unmesh Prakashan ǀ Aasha Parulekar ǀ Asha Parulekar ǀ Marathi Margadarshanpar Lekhǀ Success Guidance in Marathi ǀ Vyaktimattv Vikas








Reviews
There are no reviews yet.
Write a customer review