सानेगुरूजी जीवन साहित्य आणि विचार
‘साने गुरुजींच्या साहित्यात जिकडे-तिकडे रडारड आहे.’
‘साने गुरुजींचा श्याम आता कालबाह्य झाला आहे.’
‘आजची मुलं साने गुरुजींची पुस्तकं मनापासून वाचतील का?’
या अशा प्रकारची मुक्ताफळे कानावर आली की, मन व्यथित होते. खरे तर या प्रकारच्या आक्षेपांना यापूर्वीच पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे यांसारख्या मान्यवरांनी उत्तरे दिलेली आहेत. पु. ल. देशपांडे म्हणतात, “साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. त्यांच्या वाड्मयाचा आस्वाद घेताना वाचकांचे डोळेही पाणावतात. साने गुरुजींच्या डोळ्यांत जे अश्रू येत असत, तसा एक अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात आले, तरी तो क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो, असे म्हणा. त्या माणसाचे मन कशासाठी रडत होते? त्यांच्या अपार कारुण्याचा शोध नको का घ्यायला? गुरुजींना जीवनातील असंख्य विसंगती आणि त्यामागे दडलेले कारुण्य दिसत होते.’
एका पिढीला ज्यांनी स्वत:च्या वाड्मयाने अक्षरश: बेड लावले, ज्यांच्या जीवनाने आणि साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली, त्या साने गुरुजींचे विचार झपाट्याने मागे पडावेत, अशाच तर्हेने गेल्या अनेक वर्षांत आजूबाजूची सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचा सारा प्रवास उलट्या दिशेनेच चालला आहे. आज भ्रष्टाचार हाच समाजामध्ये शिष्टाचार म्हणून संभावितपणे मिरवत आहे. आणि सर्वांत वाईट म्हणजे ‘हे असंच चालायचं’, असे पालुपद आळवत आम्ही निगरगट्ट मनाने केविलवाणे जीवन जगत आहोत. हे चित्र बदलणार कधी? साने गुरुजींच्या जीवनाची आणि विचारांची पणती हे काम अल्पांशाने तरी करू शकेल, असा विश्वास वाटतो. त्या वेळचा परिस्थितीचा संदर्भ कदाचित कालबाह्य झाला असेल; पण ज्या मूल्यांसाठी गुरुजी जगले आणि त्यांनी साहित्यनिर्मिती केली, ती मूल्ये चिरंतन आहेत, यात काय संशय?
लहानपणापासून माझा पिंड अन्नाइतकाच साने गुरुजींच्या साहित्यावर पोसला आहे. साने गुरुजींना प्रत्यक्ष पाहण्याचे किंवा त्यांच्या तोंडून गोष्टी ऐकण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण मला त्याची फारशी खंत वाटत नाही. कारण त्यांच्या साहित्यातून ते सतत भेटतच असतात. त्यांच्या साहित्यात कलात्मकतेच्या दृष्टीने काही उणिवा आहेत, हे मान्य करूनसुद्धा त्यातील चिरंतन अशी जीवनमूल्ये दृष्टिआड करता येणार नाहीत. ज्यांना साने गुरुजींचे जीवन आणि कार्य समजले आहे, अशा त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांनी पुढाकार घेऊन हे साहित्य आधुनिक दृष्टिकोन स्वीकारून, बदलत्या काळाचा संदर्भ लक्षात घेऊन मूळ गाभ्याला धक्का न लावता, पण नवा साज चढवून समाजासमोर मांडायला हवे. ज्यांतून अनेक चित्रपट, नाटके, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती होऊ शकेल, अशी असंख्य बीजे त्यांच्या कथाकादंबर्यांत व प्रत्यक्ष जीवनात आहेत, हे त्यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या कोणालाही पटू शकेल.
Keywords : Saneguruji Jivan Sahitya ani Vichar ǀ Dr.Anil Godbole | Unmesh Prakashan ǀ Saneguruji charitra Book ǀ Saneguruji Marathi Pustak ǀ thor Purush Vyaktichitre













Reviews
There are no reviews yet.
Write a customer review